मठ कणकेवाडीच्या शाळेत रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन

मठ कणकेवाडीच्या शाळेत रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन


 

मठ 


      निसर्गाशी नाते जपताना आरोग्यदायी आहाराचे महत्त्व पटवून देणारे रानभाज्यांचे आकर्षक प्रदर्शन बुधवारी 12 ऑगस्ट रोजी मठ कणकेवाडी नं. 3 शाळेत उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीची ओळख निर्माण व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यार्थी आणि पालकांनी परिसरात आढळणाऱ्या विविध रानभाज्या आणून त्यांची सुंदर मांडणी केली. तेरं, शेवगा, टाकळा, भारंगी, कुड्याच्या शेंगा, सुरण, फागलं, गुळवेल, पेवा, कुरडू, दिंडा, लाजाळू, अळंबी, एक पानी भाजी यांसह अनेक रानभाज्यांची माहिती, त्यांचे पौष्टिक गुणधर्म आणि उपयोग विद्यार्थ्यांनी उपस्थितांना सांगितले.आरोग्य सेविका सारंग मॅडम आणि मुख्याध्यापक पोळजी सर यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे औषधी व पौष्टिक महत्त्व समजावून सांगितले. तसेच रानभाज्यांचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्याची गरज त्यांनी पटवून दिली. प्रदर्शनाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक घोरपडे मॅडम यांनी केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ‘स्थानिक अन्न – निरोगी जीवन’ हा संदेश मिळाला. निसर्गाशी असलेले नाते दृढ करणारा आणि पारंपरिक ज्ञानाची ओळख करून देणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अवीन गावडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष नामदेव सावंत, सिद्धेश गावडे, जयश्री सकपाळ, मानसी भगत, ऋतुजा परब, ईशा गावडे, दिक्षा परब, आरोग्य सेवक केळजी सर, अंगणवाडी सेविका ज्योती परब मॅडम, मदतनीस गावडे मॅडम, शिक्षक भोई सर आणि पालक उपस्थित होते.