५९ व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात बी. एस. बांदेकर फाईन आर्ट कॉलेजचे घवघवीत यश
सावंतवाडी
५९ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या Zone XI, Sindhudurg अंतर्गत आयोजित फाईन आर्ट विभागातील विविध स्पर्धांमध्ये सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट (अप्लाइड आर्ट)च्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धांमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांत उत्कृष्ट सादरीकरण करत एकूण पाच पारितोषिके मिळविली. ऑन-द-स्पॉट पेंटिंग स्पर्धेत साहिल नांदगावकर याने द्वितीय क्रमांक, तर कोलाज स्पर्धेत रुतुजा सुतार हिने द्वितीय क्रमांक पटकावला. पोस्टर मेकिंग स्पर्धेत लक्ष्मण परब याने उत्तेजनार्थ पारितोषिक, रांगोळी स्पर्धेत प्रसाद खोरागडे याने उत्तेजनार्थ पारितोषिक, तर कार्टूनिंग स्पर्धेत यश बरडे याने द्वितीय क्रमांक मिळविला. विद्यार्थ्यांनी चित्रकला, कोलाज, पोस्टर, रांगोळी आणि व्यंगचित्र या विविध कलाप्रकारांतून आपली सर्जनशीलता, कल्पकता आणि कलाकौशल्य प्रभावीपणे सादर केले. या यशामुळे सिंधुदुर्ग विभागातील फाईन आर्ट क्षेत्रात महाविद्यालयाची पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी अधोरेखित झाली आहे. या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे इव्हेंट कोऑर्डिनेटर श्री. तुळशीदास नाईक आणि सौ. पल्लवी गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे चेअरमन श्री. रमेश भाट, प्राचार्य श्री. उदय वेले तसेच सर्व प्राध्यापकवृंद यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कलावाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते विविध स्तरांवर उत्तुंग कामगिरी करू शकतात, हे या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
konkansamwad 
