कणकवलीत आजारी विद्यार्थिनीसाठी शिक्षक समितीची आर्थिक मदत
कणकवली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेने आपली सामाजिक बांधिलकी जपत एका गरजू विद्यार्थिनीला मोलाची आर्थिक मदत केली आहे.कळसुली सुद्रिकवाडी येथील सहावीत शिकणारी हर्षिता नंदकिशोर सुद्रीक ही विद्यार्थिनी सध्या गंभीर कर्णदोषामुळे आजारी आहे. तिच्यावर पुढील उपचार आणि शस्त्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक असल्याने, शिक्षक समितीने पुढाकार घेऊन तिला १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.हर्षिताच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या खर्चाची गरज असल्याचे समजताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचा निर्णय घेतला. हा धनादेश सुपूर्द करण्यासाठी शिक्षक समितीचे जिल्हा आणि तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने तालुकाध्यक्ष सुशांत मर्गज, शिक्षक नेते टोनी म्हापसेकर, जिल्हा उपाध्यक्ष धीरज हुंबे, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष कुडाळकर आणि इतर मान्यवरांचा समावेश होता. या सर्वांनी हर्षिताला भेटून तिला धीर दिला आणि तिच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा दिल्या.केवळ शिक्षकांचे प्रश्न सोडवणे इतकीच संघटनेची जबाबदारी नसून, समाजातील गरजू घटकांसाठी धावून जाणे हे देखील आमचे कर्तव्य आहे, अशी भावना यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. शिक्षक समितीच्या या संवेदनशील पावलामुळे सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. याप्रसंगी पतपेढी संचालक श्रीकृष्ण कांबळी, ऋतुजा जंगले, अजय तांबे, निलेश ठाकूर, किशोर गोसावी, संतोष राणे यांच्यासह नंदकुमार सरंगले, जगन्नाथ घाडीगांवकर आणि प्रशांत दळवी असे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
konkansamwad 
