सावंतवाडीत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दिवंगत अजित पवार यांची जयंती साजरी
सावंतवाडी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै २०२६ रोजी सावंतवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सकाळी ११.३० वाजता झालेल्या या कार्यक्रमात पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.यावेळी उपस्थितांनी दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाची आठवण जागवली. सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांच्या अडचणी समजून घेण्याची वृत्ती आणि कार्यकर्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याची त्यांची कार्यशैली यामुळे त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते, असे मत वक्त्यांनी व्यक्त केले.अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राने एक तडफदार, अभ्यासू आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व गमावल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे कार्यकर्ते संघटन असून, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने जिल्ह्याचा दौरा करून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधल्यास पक्ष संघटना अधिक बळकट होईल, असे मतही यावेळी मांडण्यात आले. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि खासदार पार्थ पवार यांनी सिंधुदुर्ग दौरा करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणीही करण्यात आली.या कार्यक्रमाला प्रदेश सरचिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदयराव भोसले, जिल्हा उपाध्यक्ष एम. डी. सावंत, अॅड. चेंदवणकर, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय कदम, रामानंद शिरोडकर, शहराध्यक्ष ऑगस्टीन फर्नांडिस, महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, सौ. नाईक, जिल्हा सदस्य गुरुदत्त कामत, कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर गावकर, रणजीत सावंत, प्रकाश गावडे, लक्ष्मण गवस, नंदकिशोर नाईक, नितेश पाटील, राम लाखे, आनंद मेस्त्री, सतीश नाईक, धर्माजी गावडे, डॉ. तुषार भोसले, सचिन पेडणेकर (वेंगुर्ला) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
konkansamwad 
