बी. एस. बांदेकर कॉलेजच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय पातळीवर निवड
सावंतवाडी
सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या तृतीय वर्षातील विद्यार्थिनी आर्या नागवेकर हिच्या कलाकृतीची PMVision2Art या प्रतिष्ठित उपक्रमासाठी निवड झाली आहे. राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यावतीने आयोजित या उपक्रमात देशभरातून आलेल्या ३००० उत्कृष्ट कलाकृतींपैकी ७५ विजेत्यांमध्ये आर्याचा समावेश झाला आहे.‘विकसित भारत’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेमुळे देशाच्या प्रगतीविषयी जनजागृती आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.या यशस्वी निवडीमुळे आर्या नागवेकर हिला पुरस्कार वितरण समारंभासाठी मुंबई येथे आमंत्रित करण्यात आले आहे. हा समारंभ सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई येथे पार पडणार असून, मान्यवर पाहुणे व पद्मश्री पुरस्कार विजेत्यांच्या उपस्थितीत आर्याचा सन्मान करण्यात येणार आहे.आर्या नागवेकर हिच्या या उल्लेखनीय यशामुळे बांदेकर कॉलेजच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून, संपूर्ण महाविद्यालयात अभिमानाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य उदय वेले, संस्थाध्यक्ष रमेश भाट, वर्गशिक्षक प्रा. सिद्धेश नेरुरकर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आर्याचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
konkansamwad 
