कुडाळमध्ये रंगणार 'शिवराज भूषण' महानाट्य

कुडाळमध्ये रंगणार 'शिवराज भूषण' महानाट्य

सावंतवाडी

 

    छत्रपती शिवाजी महाराजांचा  इतिहास आणि त्यांचा पराक्रम जगभर पोहोचवणारे कवी भूषण यांच्या काव्यावर आधारित 'शिवराज भूषण' हे भव्य महानाट्य कुडाळमध्ये सादर होणार आहे.येत्या शनिवारी, १८ एप्रिलला सायंकाळी ७:३० वाजता कुडाळ येथील बाबा वर्दम स्मृती रंगमंचावर या महानाट्याचा प्रयोग पार पडणार असल्याची माहिती भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली.या महानाट्याचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मालवण आणि कुडाळ परिसरातील ८२ स्थानिक कलाकार सहभागी आहेत. प्रयोगा दरम्यान भव्य एलईडी स्क्रीन, एआय तंत्रज्ञान आणि चित्तथरारक लढायांचे प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळतील. विशेषतः १६६४ मधील कुडाळ जवळील 'खवासखानाची लढाई' आणि किल्ले सिंधुदुर्गची निर्मिती असे स्थानिक इतिहासाशी निगडित प्रसंग या नाटकातून उलगडणार आहेत. कवी भूषण यांनी महाराजांच्या समकाळात लिहिलेल्या ३८२ छंदांपैकी निवडक २१ छंदांच्या माध्यमातून हा इतिहास मांडला आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी हे शिवकाव्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही साटम यांनी यावेळी नमूद केले.या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांच्या तिकीट दरात विशेष सवलत देण्यात आली आहे. जास्तीत-जास्त शिवप्रेमींनी आणि विद्यार्थ्यांनी या महानाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवराज मंच, मालवणच्या वतीने करण्यात आले आहे.