वेंगुर्ला मोटारसायकल चोरी प्रकरणातील फरार आरोपी गोव्यातून ताब्यात
सिंधुदुर्गनगरी, ता. २८
वेंगुर्ला पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील फरार संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यात सापळा रचून ताब्यात घेतले. धीरज दिलीप गुप्ता (वय 20, रा. गणेशनगर, कोलवले, गोवा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. वेंगुर्ला पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संशयित गुप्ता हा पणजी परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पणजी येथे सापळा रचून धीरज गुप्ता याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील तपास व कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला वेंगुर्ला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, डॉमीनिक डिसोझा, हवालदार जॅकसन घोन्सालविस, पोलीस अंमलदार अमर कांडर, महेश्वर समजिस्कर तसेच सायबर विभागाच्या धनश्री परब यांचा सहभाग होता.
konkansamwad 
