सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये अन्नात झुरळ

सिंधुदुर्गनगरीतील जिल्हा रुग्णालयाच्या कँटीनमध्ये अन्नात झुरळ

सिंधुदुर्गनगरी ता. २८ ऑगस्ट 


  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयाच्या उपहारगृहामध्ये अस्वच्छता आणि गंभीर त्रुटी आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित उपहारगृहाचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे. उपहारगृहातील अन्नात झुरळ सापडल्याची घटना घडल्यानंतर ही धडक कारवाई करण्यात आली असून पुढील आदेश येईपर्यंत कँटीन पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी या उपहारगृहातील खाद्यपदार्थामध्ये मेलेले झुरळ आढळल्याचा प्रकार घडला होता. याबाबत एका व्यक्तीने जिल्हा अन्न व औषध प्रशासनाकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने आज अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने उपहारगृहाची अचानक पाहणी व तपासणी केली. या तपासणीत अस्वच्छतेसह अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. तपासणीदरम्यान किचनमध्ये कमालीची अस्वच्छता आढळून आली. धान्य, अन्नपदार्थ आणि पिठाची साठवणूक अयोग्य पद्धतीने करण्यात आली होती, तर साखरेमध्ये मुंग्या आढळल्या. तसेच उपहारगृहातील स्वयंपाक्याने योग्य गणवेश परिधान केलेला नव्हता आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आलेली नव्हती. या रुग्णालयातील उपहारगृहाचा वापर दररोज शेकडो रुग्णांचे नातेवाईक करतात आणि येथूनच रुग्णांसाठी खाद्यपदार्थ नेले जातात. त्यामुळे या अस्वच्छतेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याला तसेच जिवाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता होती. या सर्व बाबींची गंभीर दखल घेत जिल्हा अन्न व औषध प्रशासनाने संबंधित उपहारगृह तात्काळ बंद करून त्याचा परवाना निलंबित केला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी दिली.