पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात.....महाराष्ट्रात मात्र पुढील ३ दिवस मुसळधारचा इशारा
मुंबई, ता. २०
नैऋत्य मान्सूनने अखेर परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी जाहीर केले की पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. सामान्य तारीख १७ सप्टेंबर असताना यंदा दोन दिवस उशिराने १९ सप्टेंबर रोजी हा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.देशात यंदा केवळ ८५ टक्केच पाऊस झाला असून १५ टक्के तूट नोंदवली गेली आहे. मान्सूनच्या परतीची रेषा सध्या रामगढ, मोहनगढ, फलोदी आणि खाजूवाला या भागांतून जात आहे. पुढील ३ ते ४ दिवसांत राजस्थानचे आणखी काही भाग, पंजाब आणि सौराष्ट्र-कच्छ मधूनही मान्सून माघार घेईल, असे IMD ने म्हटले आहे.परतीचा प्रवास सुरू झाला असला तरी महाराष्ट्रासाठी दिलासा नाही. बंगालच्या उपसागरात आणि उत्तर अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने राज्यात पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.हवामान विभागाने आज २० सप्टेंबर रोजी राज्यातील २४ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भात ३० ते ५० किमी वेगाने वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः २२ ते २३ सप्टेंबर दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
konkansamwad 
