वन्य हत्तींना खाद्य देणे, त्रास देणे व त्यांच्या जवळ जाणे टाळा....सावंतवाडी वन विभागाचे नागरिकांना आवाहन
सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांमध्ये वन्य हत्तींचा वावर आढळून येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी वन्य हत्तींपासून सुरक्षित अंतर राखावे, तसेच त्यांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन सावंतवाडी वन विभागाने केले आहे. वन्य हत्तींच्या सुरक्षिततेसह मानवी जीविताचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी वन्यजीव संरक्षणासंबंधी नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे. वन्य हत्तींचा वावर असलेल्या परिसरातील नागरिकांनी वन्य हत्तींपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. काही व्यक्ती वन्य हत्तींना केळी, ऊस, नारळ किंवा इतर खाद्यपदार्थ देणे, त्यांना जवळ बोलावणे, छायाचित्रे काढणे अथवा व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यांच्या अगदी जवळ जाणे असे प्रकार करतात. अशा कृतींमुळे वन्य हत्तींच्या नैसर्गिक वर्तनात व्यत्यय येण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित व्यक्तींच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. वन्य हत्ती हे वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत संरक्षित वन्यप्राणी आहेत. त्यांना जाणूनबुजून त्रास देणे, त्यांच्या पिल्लांजवळ जाणे किंवा त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणणे यांसारख्या कृत्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते. वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ मधील तरतुदींनुसार वन्यजीवविषयक गुन्ह्यांसाठी दंड व कारावासाची तरतूद आहे. त्यामुळे नागरिकांनी वन्य हत्तींशी संबंधित कोणतेही बेकायदेशीर कृत्य करू नये, असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. वन विभागाने नागरिकांना पुढील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. वन्य हत्तींना कोणत्याही प्रकारचे खाद्य देऊ नये. केळी, ऊस, नारळ, भात किंवा इतर खाद्यपदार्थ देऊन त्यांना मानवी वस्तीच्या दिशेने आकर्षित करू नये. वन्य हत्तींच्या जवळ जाऊ नये. छायाचित्रे किंवा व्हिडिओ काढण्यासाठी हत्तींच्या जवळ जाणे टाळावे. वन्य हत्तींचा पाठलाग करू नये. दुचाकी, चारचाकी किंवा इतर वाहनांमधून हत्तींचा मागोवा घेणे, त्यांना घेरणे अथवा त्यांच्या हालचालींमध्ये अडथळा आणणे टाळावे. वन्य हत्तींचा मार्ग अडवू नये. हत्ती रस्ता ओलांडत असताना सुरक्षित अंतरावर थांबावे. त्यांना जाण्यासाठी पुरेशी मोकळी जागा द्यावी आणि त्यांच्या हालचालींमध्ये हस्तक्षेप करू नये. सोशल मीडियासाठी धोकादायक कृती करू नयेत. रील्स, व्हिडिओ किंवा सेल्फी काढण्यासाठी हत्तींच्या जवळ जाणे, त्यांना आकर्षित करणे किंवा त्यांच्या नैसर्गिक हालचालींमध्ये व्यत्यय आणणे टाळावे. वन्य हत्ती दिसल्यास वन विभागाला कळवावे. हत्तींच्या हालचालींची माहिती जवळच्या वन कार्यालयाला किंवा वन कर्मचाऱ्यांना द्यावी. नागरिकांनी स्वतःहून हत्तींना हुसकावण्याचा किंवा त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करू नये. वन्य हत्तींना खाद्य दिल्यामुळे ते मानवी वस्तीशी परिचित होण्याची आणि मानवी वस्तीजवळ खाद्य शोधण्याची शक्यता वाढते. परिणामी, भविष्यात मानव-हत्ती संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे वन्य हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरू देणे आणि त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणे हे नागरिकांच्या तसेच वन्यजीवांच्या हिताचे आहे. वन्य हत्तींना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्तपणे वावरू देणे आणि त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखणे हे नागरिकांच्या तसेच वन्यजीवांच्या हिताचे आहे. वन्य हत्तींच्या वावराच्या ठिकाणी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, वन विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि वन्यजीव संरक्षणाच्या कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक (प्रादेशिक) यांनी केले आहे. या सूचनांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कायद्यातील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल.
konkansamwad 
