शिरोडा-वेळागरवाडी येथे घरफोडी..... एकूण ५,७१,५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास

वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा-वेळागरवाडी येथील रहिवासी सौ. सुरभी कलंगुटकर यांच्या राहत्या घरात घरफोडी होऊन तब्बल ५ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. यात सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. कलंगुटकर या ३ जुलैला कामानिमित्त रत्नागिरी येथे गेल्या होत्या. ४ जुलैला त्या घरी परतल्यावर त्यांना घराच्या दर्शनी दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहिले असता, घरातील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी कपाटातून १ लाख ५४ हजार रुपये किमतीच्या ४ सोन्याच्या बांगड्या, ७० हजार रुपये किमतीच्या २ सोन्याच्या पाटल्या, १ लाख २२ हजार ५०० रुपये किमतीच्या २ सोन्याच्या चेन्स, ७५ हजार रुपये किमतीचे ४ सोन्याचे कानातले जोड, ७५ हजार रुपये किमतीचे २ सोन्याचे गळ्यातील हार, २१ हजार रुपये किमतीचे २ सोन्याचे कानातील पट्टे, ४९ हजार रुपये किमतीचे १ सोन्याचे काळे मणी असलेले मंगळसूत्र, आणि ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५ लाख ७१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.वेंगुर्ले पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दाभोलकर करत आहेत.