गोळाफेकमध्ये अणसूर-पाल हायस्कूलच्या खुशी गावडेची विभागीय स्पर्धेसाठी निवड
वेंगुर्ला
अणसूर-पाल विकास मंडळ मुंबई संचलित अणसूर-पाल हायस्कूल, अणसूरच्या विद्यार्थिनी खुशी किशोर गावडे हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात गोळाफेकमध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे तिची डेरवण, चिपळूण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली असून सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलींच्या गटात खुशी किशोर गावडे हिने गोळाफेक प्रकारात दुसरा क्रमांक पटकावला. त्यामुळे तिची डेरवण, चिपळूण येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासाठी तिला क्रीडा प्रशिक्षक हेमंत गावडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या यशामुळे अणसूर-पाल हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष गोविंद गावडे, सचिव लिलाधर गावडे, खजिनदार बाळकृष्ण तावडे, शालेय समिती चेअरमन एम. जी. मातोंडकर, सदस्य दीपक गावडे, दत्ताराम गावडे, देवू उर्फ बाबी गावडे, मुख्याध्यापक व सर्व शालेय परिवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
konkansamwad 
