अंगणवाडी टेक होम राशनच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; जि. प. सभापती अनुराधा नारकर यांची तातडीने दखल

अंगणवाडी टेक होम राशनच्या दर्जावर प्रश्नचिन्ह; जि. प. सभापती अनुराधा नारकर यांची तातडीने दखल

बांदा, ता. २८


  एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना देण्यात येणाऱ्या टेक होम राशनच्या गुणवत्तेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी तातडीने दखल घेतली. येथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांनी याबाबत तक्रार केली होती. बालकांच्या आरोग्याशी निगडित विषय असल्याने नारकर यांनी संबंधित अधिकारी, पोषण आहार पुरवठादार व तक्रारदारांची बैठक घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. बैठकीत तक्रारदारांनी प्रत्यक्ष पोषण आहाराची पाकिटे व त्यातील आहाराचा दर्जा निदर्शनास आणून दिला. कोकणातील आर्द्र हवामानामुळे पॅकेटमधील पोषण आहार खराब होत असून तो बालकांच्या सेवनासाठी अयोग्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देण्यात येणारा प्रिमिक्स आहार कोकणातील हवामान व स्थानिक परिस्थितीला अपेक्षित स्वरूपात अनुकूल नसल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. पोषण आहारातील घटक, निर्मिती प्रक्रिया तसेच साठवणुकीची पद्धत निश्चित करताना स्थानिक हवामान आणि खाद्यसंस्कृतीचा विचार होणे आवश्यक असल्याचे तक्रारदारांनी सांगितले. शासनाकडून बालकांना पोषक आहार मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात असला, तरी आहाराचा दर्जा खराब असल्यास अथवा तो स्थानिक परिस्थितीला अनुकूल नसल्यास त्याचा अपेक्षित लाभ बालकांना मिळणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. सध्याच्या प्रिमिक्स आहाराऐवजी स्थानिक हवामान व खाद्यपद्धतीला अनुरूप अधिक सकस व पोषक आहार उपलब्ध करून द्यावा, तसेच वितरणापूर्वी आहाराची प्रयोगशाळेत तपासणी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली. बालकांच्या पोषणाचा विषय गांभीर्याने घेत नारकर यांनी अधिकारी व पोषण आहार पुरवठादारांशी चर्चा केली. यावेळी पोषण आहाराच्या पॅकिंगच्या दर्जात सुधारणा करण्याचे पुरवठादाराकडून मान्य करण्यात आले. मात्र, आहाराचा मेनू बदलणे हा धोरणात्मक निर्णय असल्याचे पुरवठादाराच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. आहाराचा दर्जा, वितरण व्यवस्था आणि बालकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळतो की नाही, यावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना नारकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. बालकांच्या आरोग्याच्या बाबतीत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. आहारतज्ज्ञ, डॉक्टर व संबंधित तज्ज्ञांची बैठक घेऊन कोकणातील हवामान व स्थानिक परिस्थितीला अनुरूप पोषक खाद्यपदार्थांचा मेनू तयार करण्यात येईल. त्यानुसार शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल. या विषयावर यापुढे विशेष लक्ष ठेवून वेळोवेळी आढावा घेण्यात येईल, असे सभापती अनुराधा नारकर यांनी सांगितले. बैठकीस सभापती अनुराधा नारकर, सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतीक उगारे, बाल विकास प्रकल्प अधिकारी छाया घाडिगावकर, सामाजिक कार्यकर्ते व तक्रारदार गुरु कल्याणकर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, पोषण आहार पुरवठादार रुपेश लोटणकर, योगेश माने, उपसरपंच रत्नाकर आगलावे, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, अंगणवाडी सेविका वर्षा आगलावे आदी उपस्थित होते.