गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायतीचे नियोजन; वाहतुकीत बदल, १० गणेशघाट सज्ज
कुडाळ दि. २८
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण, गणेश विसर्जन, आरोग्य सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी कुडाळ नगरपंचायतीने व्यापक नियोजन केले आहे. नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पार पडलेल्या समन्वय बैठकीत विविध शासकीय व प्रशासकीय विभागांच्या सहकार्याने गणेशोत्सव कालावधीतील उपाययोजनांबाबत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उत्सव काळात शहरातील मुख्य रस्ता सुरळीत ठेवण्यासाठी 7 ते 25 सप्टेंबरदरम्यान हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका एसटी डेपोपर्यंतचा नगरपंचायतीचा रस्ता पूर्णपणे मोकळा ठेवला जाणार असून या मार्गावर व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गणेशमूर्ती व गणेशोत्सव साहित्याच्या विक्रीसाठी 12 व 13 सप्टेंबर रोजी पोस्टाजवळ आणि नगरपंचायत पटांगणात विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच नार्वेकर बेकरी ते भाट बिल्डिंग परिसर, नगरपंचायत पटांगण आणि भाजीमार्केट या ठिकाणी किरकोळ पथविक्रेत्यांना व्यापाराची मुभा राहिल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कुडाळ-पुणे, मुंबई आणि इतर भागांतून ये-जा करणाऱ्या खासगी व लक्झरी बसेसना हॉटेल अभिमन्यू ते काळप नाका या मार्गावर प्रवेशबंदी करण्यात आली असून या बसेसची वाहतूक महामार्गावरूनच सुरू राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी काळप नाका, सत्यम हॉटेल आणि आर.एस.एन. हॉटेल येथे चढ-उताराची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय 7 ते 25 सप्टेंबरदरम्यान मालवण-कुडाळ मार्गावरील अवजड डंपर वाहतूक बंद ठेवून ती मालवण-नेरुर (जकात)-एमआयडीसी कुडाळ या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. सकाळी 9 ते रात्री 8 या वेळेत मुख्य बाजारपेठेत अवजड व चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी अनंत मुक्ताई हॉटेलसमोरील मोकळी जागा व दिवाणी न्यायालय परिसर, तर दुचाकी वाहनांसाठी जिजामाता चौक ते नक्षत्र टॉवर मार्गावर सम-विषम पार्किंग व्यवस्था केली जाईल. पुष्पा हॉटेल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर नो-पार्किंग झोन लागू असेल. नगरपंचायत हद्दीतील 10 गणेशघाटांवर मंडप, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक, स्वच्छता आणि निर्माल्य संकलनाची सोय केली जाणार आहे. विसर्जनादरम्यान सुरक्षेचा भाग म्हणून महापुरुष गणेशघाट, गुलमोहर शेजारील गणेशघाट आणि सांगिडेवाडी गणेशघाट येथे मगरींचा वावर लक्षात घेऊन वन विभागाच्या वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व घाटांवर प्रथमोपचार पेटी, वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका सज्ज ठेवली जाईल. तसेच शहरातील खड्डे बुजवणे, हायमास्ट दिव्यांची देखभाल आणि धोकादायक विद्युत तारांची दुरुस्ती तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहराचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी पूर्वपरवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज, बॅनर आणि फ्लेक्स नगरपंचायतीकडून हटवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत राहणार असून घाटांवर नोडल अधिकारी नियुक्त केले जातील. प्रशासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करून गणेशोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन कुडाळ नगरपंचायतीने केले आहे. या बैठकीस उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी खंडू पवळ, विविध नगरसेवक, तसेच महसूल, सार्वजनिक बांधकाम, वीज, पोलीस, वाहतूक, वन, आरोग्य व परिवहन विभागाचे अधिकारी आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
konkansamwad 
