कुडाळ पोलिसांचे 'एक राखी सुरक्षेची' अभियान; वाहनचालकांना बांधली सुरक्षेची राखी

कुडाळ पोलिसांचे 'एक राखी सुरक्षेची' अभियान; वाहनचालकांना बांधली सुरक्षेची राखी

कुडाळ, ता. 28 


      राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांच्या वतीने शहरात एक राखी सुरक्षेची हे विशेष अभियान यशस्वीरीत्या राबवण्यात आले. रस्ता सुरक्षेचे नियम पाळून सुरक्षित वाहन चालवा, असे आवाहन या अभियानाच्या माध्यमातून वाहनचालकांना करण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्हाभरात हे अभियान आयोजित करण्यात आले होते. कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रमुख ठिकाणी चालकांना सुरक्षा राखी बांधून वाहतूक नियमांबद्दल जनजागृती करण्यात आली. कुडाळ येथील पोस्ट ऑफिस चौक येथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कुडाळ बस स्थानक, माझं कुडाळ सेल्फी पॉईंट आणि एस. आर. एम. कॉलेजजवळील एस. एन. देसाई चौक या भागांत हा उपक्रम राबवण्यात आला. रस्त्यावरून जाणाऱ्या एसटी बस चालक, रिक्षाचालक, दुचाकी व चारचाकी चालक तसेच पत्रकारांना पोलिसांनी सुरक्षेची राखी बांधली. बस स्थानकावरील रिक्षाचालकांना वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. रक्षाबंधनाला भावाने बहिणीचे रक्षण करायचे हा संदेश दिला जातो, पण वाहतुकीचे नियम पाळल्यास आपण स्वतःचेही रक्षण करू शकतो, हा विचार या अभियानातून मांडण्यात आला. अभियानादरम्यान दुचाकी चालवताना हेल्मेटचा आणि चारचाकी चालवताना सीट बेल्टचा वापर करणे, वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे, मद्यपान करून किंवा मोबाईलवर बोलताना वाहन न चालवणे आणि रस्त्यावर स्वतः सह इतरांच्या सुरक्षेची काळजी घेणे याविषयी चालकांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. केवळ नियम आहेत म्हणून ते पाळू नका, तर हे नियम नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच तयार करण्यात आले आहेत याची जाणीव ठेवा, असे आवाहन पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी केले. वाहने सावकाश चालवून सुरक्षित राहा, कारण घरी तुमची जवळची माणसे तुमची वाट पाहत असतात, असा भावनिक संदेश पोलिसांनी दिला आणि त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी पोलीस निरीक्षक विकास बडवे, पोलीस अंमलदार प्रमोद काळसेकर, ममता जाधव, वाहतूक पोलीस ज्योती रायशिरोडकर, शाम भगत, सिद्धेश चिपकर, संदीप वराडकर, महेश जळवी, वेदिका गावडे, अनिरुद्ध सावर्डे, तसेच साई जळवी फिल्म्स टीमचे साई जळवी, ऋचा शिर्के, नेहा चव्हाण आणि ओंकार पालव आदी उपस्थित होते.