राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता

मुंबई
 

       राज्यात काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाने आज, 1 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर कोकणातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. या काळात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यातही अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहू शकतात. दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.