सहकारी संस्थांचा पाया शेतकरीच - मनीष दळवी.....१००% कर्जवसुली करणाऱ्या १९ संस्थांचा जिल्हा बँकेतर्फे सत्कार

सहकारी संस्थांचा पाया शेतकरीच - मनीष दळवी.....१००% कर्जवसुली करणाऱ्या १९ संस्थांचा जिल्हा बँकेतर्फे सत्कार

कणकवली

 

     सहकारी संस्थांचा खरा पाया शेतकरी आहे. विकास संस्थांनी केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. विकास संस्थांना सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक खंबीरपणे पाठीशी उभी राहील, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.कणकवलीतील चौंडेश्वरी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने 100 टक्के कर्जवसुली करणाऱ्या प्राथमिक विकास संस्थांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दीपप्रज्वलन अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. कणकवली तालुक्यातील असलदे विकास सोसायटीने बँक व संस्था पातळीवर सलग 5 व्या वर्षी 100 टक्के कर्जवसुलीचा अनोखा विक्रम केल्याने संस्थेचे अध्यक्ष भगवान लोके आणि सचिवांचा विशेष सत्कार करण्यात आला. याशिवाय खारेपाटण, नांदगाव, शिवडाव, फोंडाघाट, नाटळ, हरकुळ बुद्रुक, सांगवे, कासार्डे, आयनल, तळेरे, वरवडे, कणकवली, कोळोशी, हळवल, तिवरे-डामरे, सातरल-कासरल, ओसरगाव आणि कलमठ अशा एकूण 19 विकास संस्थांना 100 टक्के कर्जवसुलीचा आदर्श निर्माण केल्याबद्दल शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.यावेळी बोलताना दळवी म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुढाकाराने झालेल्या संगणकीकरणामुळे सहकार क्षेत्रात शिस्त आणि पारदर्शकता वाढली आहे. जिल्ह्यातील शेतकरी प्रामाणिक असून नियमित कर्जफेड करतो. बँक आता 'सुगी' अॅपच्या माध्यमातून कर्जवाटप अधिक गतिमान करणार असून ऑनलाइन प्रस्तावानंतर 24 तासांत उत्तर आणि 48 तासांत कर्ज मंजूर केले जाईल. शेतघर, कंपाऊंड वॉल, घरदुरुस्तीसाठी पात्र सभासदांना 5 लाखांपर्यंतचे कर्ज सहज उपलब्ध करून दिले जाणार आहे. सहकार कायद्यानुसार प्रत्येक संस्थेत स्वतंत्र सचिव नेमून त्यांना दरमहा 17,500 रुपये वेतन देण्याचा निर्णय झाला असून भविष्यात कामगिरीनुसार बोनस देण्याचाही विचार आहे. जागा नसलेल्या संस्थांसाठी शासनामार्फत जागा मिळवून दिली जाईल आणि काजू बोर्डाच्या गोदामांसाठी 50 टक्के अनुदान मिळेल. जिल्ह्यातील 228 विकास संस्थांसाठी अभ्यास दौरा आणि वर्षात 3 हजार दुभती जनावरे उपलब्ध करून देऊन दुग्ध व्यवसायाला चालना दिली जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.कार्यक्रमाला जिल्हा बँक संचालक विठ्ठल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, गजानन गावडे, बाजार समिती सभापती तुळशीदास रावराणे, खरेदी-विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत, उपकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, अंतर्गत लेखापरीक्षक के. डी. वरक, तालुका विकास अधिकारी दिगंबर गवाणकर, शाखा व्यवस्थापक राजू घाडीगावकर यांच्यासह बँक अधिकारी आणि विकास संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.