पुस्तकाबाहेरचं ज्ञान! तुळसच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन घेतला शेतीचा धडा

पुस्तकाबाहेरचं ज्ञान! तुळसच्या विद्यार्थ्यांनी शेतात जाऊन घेतला शेतीचा धडा

तुळस

 

     पुस्तकी ज्ञानासोबत श्रमाचे महत्त्व आणि शेतीची गोडी विद्यार्थ्यांना लावण्यासाठी स्वामी विवेकानंद विद्यालय, तुळस फातरवाडा येथे 'बांधावरची शाळा' हा नाविन्यपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला.या उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि निसर्गाची जवळून ओळख करून देण्यात आली.

या 'बांधावरच्या शाळेत' विद्यार्थ्यांना खालील विषयांवर प्रत्यक्ष मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिके देण्यात आली : 
- आधुनिक शेती तंत्रज्ञान: शेतीतील यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर आणि पॉवर टिलरचा वापर तसेच नवीन आधुनिक पद्धतींची सविस्तर माहिती देण्यात आली. 
- लावणी तंत्राचे प्रात्यक्षिक : विद्यार्थ्यांनी स्वतः शेतात उतरून तरवा काढणे, भातलावणी करणे आणि सेंद्रिय खतांचा योग्य वापर कसा करावा हे प्रत्यक्ष अनुभवले. 
- रानभाज्यांची ओळख : आरोग्यासाठी उपयुक्त असणाऱ्या परिसरातील विविध रानभाज्यांची माहिती आणि त्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

      उपक्रमात शाळेचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका श्रीम. स्मिता गवंडे, शिक्षिका श्रीम. राशी पोळजी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पुस्तकांमधून न मिळणारे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळाल्याने विद्यार्थीही भारावून गेले होते. शेतीची आवड निर्माण व्हावी आणि कष्टाचे मोल कळावे या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.शाळा म्हणजे फक्त वर्गखोली नव्हे, तर निसर्गही एक मोठी शाळा आहे, हाच संदेश या 'बांधावरच्या शाळे'ने दिला.