मुंबई-सावंतवाडी रोड दरम्यान धावणार नवी दैनिक एक्स्प्रेस.....अनेक महत्त्वाच्या स्थानकांना मिळणार थेट रेल्वे संपर्क
सिंधुदुर्ग
कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकांना थेट रेल्वे संपर्क मिळणार आहे.रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या दररोज धावणार आहेत. या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.मुंबई महानगर प्रदेश आणि दक्षिण कोकण यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार असून पर्यटन, शिक्षण, रोजगार, उद्योग-व्यवसाय तसेच सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे. कोकणातील समुद्रकिनारे, किल्ले, देवस्थाने आणि पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. तसेच व्यापारी, विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे नागरिक आणि स्थानिक प्रवाशांना मुंबईकडे जाण्यासाठी आणखी एक थेट आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. भारतीय रेल्वेने प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वे संपर्क अधिक सक्षम करणे आणि संतुलित प्रादेशिक विकासाला चालना देणे या उद्देशाने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, अरविंद सावंत, सुनील तटकरे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार सुलभा गायकवाड, माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.
konkansamwad 
