गुरूंच्या चरणी हरित वंदन.....गुरुपौर्णिमेनिमित्त कळसुलकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावली १०१ तुळशीची रोपे
सावंतवाडी
गुरुपौर्णिमेचा पवित्र उत्सव यंदा निसर्गाशी जोडत सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळा, सावंतवाडी (कळसुलकर शाळा) येथे "गुरूंच्या चरणी हरित वंदन" हा अभिनव उपक्रम उत्साहात साजरा झाला. गुरूंप्रती कृतज्ञता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात 101 तुळशीची रोपे लावून हरित संकल्प साकारला. उपक्रमाच्या सुरुवातीला सहाय्यक शिक्षक श्री. डी. जी. वरक यांनी गुरुपौर्णिमेचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच बदलत्या काळातही गुरुचे स्थान किती महत्त्वाचे आहे याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिक्षकांनी तुळशीचे पर्यावरणीय, औषधी आणि धार्मिक महत्त्व पटवून देत वातावरण शुद्ध ठेवण्यास आणि प्राणवायू निर्मितीत तुळशीची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपाचे नियमित संगोपन आणि संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारण्यास सांगितले. शाळेच्या प्रांगणात उत्साहाने 101 तुळशीची रोपे लावत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला ज्यामुळे त्यांच्यामध्ये निसर्गप्रेम, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण झाली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप सावंत, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. सूर्यकांत भुरे, शिक्षक श्री. वरक, कांबळे सर, गुंजाळ मॅडम, बिले मॅडम, राऊळ मॅडम, आडेलकर मॅडम, घाडीगावकर मॅडम, विद्यार्थी, पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालक प्रतिनिधी सौ. पूजा अरवारी यांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊचे वाटप करून उपक्रमात आनंदाची भर घातली आणि त्यांच्या सहकार्याबद्दल शाळेतर्फे विशेष आभार मानण्यात आले. गुरूंबद्दलचा आदर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून "गुरूंचा आशीर्वाद आणि निसर्गाची साथ – हरित भविष्यासाठी एक छोटासा प्रयत्न" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यात शाळेला यश मिळाले.
konkansamwad 
