राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!... खरीप २०२६ पिकस्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज सुरू....राज्यस्तरावर ५० हजारांपर्यंत बक्षीस
सिंधुदुर्गनगरी
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम 2026-27 साठी राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची पिकस्पर्धा जाहीर करण्यात आली असून यंदा पारदर्शकतेसाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येणार आहे. सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर विजेत्यांची निवड शेतकऱ्यांच्या उत्पादकतेवर आधारित होणार असून या स्पर्धेत भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग आणि सुर्यफुल या 11 पिकांचा समावेश आहे. स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसणे आवश्यक असून भातासाठी किमान 20 गुंठे तर इतर पिकांसाठी किमान 40 गुंठे क्षेत्र लागवडीखाली हवे. एका शेतकऱ्याला एकापेक्षा जास्त पिकांसाठी अर्ज करता येईल. अर्जासाठी फार्मर आयडी, प्रवेश शुल्क चलन, जात प्रमाणपत्र आणि बँक पासबुक आवश्यक असून सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये शुल्क आहे. मूग व उडीदसाठी अर्जाची शेवटची तारीख 31 जुलै 2026 तर इतर पिकांसाठी 31 ऑगस्ट 2026 आहे. तालुका पातळीवर पहिल्या क्रमांकाला 5 हजार, जिल्हा पातळीवर 10 हजार आणि राज्य पातळीवर 50 हजार रुपयांपर्यंत बक्षीस दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील "पीक स्पर्धा नोंदणी" टॅबवर अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
konkansamwad 
