बांदा-दाणोली रोडवर गोवा बनावटीचे ३५ बॉक्स विदेशी मद्य जप्त....८ लाखांचा मुद्देमाल ताब्यात
सावंतवाडी
राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली पथकाने बांदा-दाणोली रस्त्यावर विलवडे गावातील चर्च समोर अवैध मद्य वाहतूक करणारी स्विफ्ट डिझायर कार पकडली. कारमधून गोवा बनावटीचे विदेशी मद्याचे 35 बॉक्स जप्त करण्यात आले. मुद्देमालासह एकूण 8,05,040 रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी.पी. सुर्वे, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर आणि अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. गोपनीय माहितीच्या आधारे दि. 18/06/2026 रोजी सकाळी 6 वाजता पथकाने तपासणी केली असता MH-02-CP-2909 क्रमांकाची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार थांबवली गेली. यावेळी कारच्या मागील सीटवर आणि डिकीमध्ये लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे विदेशी मद्य आढळून आले. एकूण 35 बॉक्स मद्याची किंमत अंदाजे 4,55,040 रु. आहे. मद्य वाहतुकीसाठी वापरलेली कारची किंमत 3,50,000 रु. मिळून एकूण 8,05,040 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी वाहन चालक संतोष मुरलीधर नागरे (37) रा. पिंपळगाव बहुला, जि. नाशिक आणि रविंद्र भाऊसाहेब शिंदे, (33), रा. रेडगाव, ता. चांदवड, जि. नाशिक या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी, धनंजय साळुंखे, विवेक कदम, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे, सतिश चौगुले, सागर सूर्यवंशी आणि अभिषेक खत्री यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक मिलिंद माळी करत आहेत.
परराज्यातून होणाऱ्या अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
konkansamwad 
