गाडीवरील ताबा सुटल्यामुळे तिलारी घाटात मालवाहू ट्रकचा अपघात
दोडामार्ग
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे तिलारी घाटात एका मालवाहू ट्रकला भीषण अपघात घडला. ही घटना आज सकाळी घडली सुदैवाने रस्त्याशेजारी असलेल्या संरक्षक कठड्यामुळे ट्रक थेट खोल दरीत कोसळण्यापासून बचावला, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र, या अपघातामुळे घाटातील संपूर्ण रस्ता अडवला गेल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला.मिळालेल्या माहितीनुसार, एक मालवाहू ट्रक आज सकाळी तिलारी घाटातून खाली उतरत होता. घाटातील एका तीव्र उताराच्या आणि धोकादायक वळणाचा अंदाज न आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट रस्त्याकाठच्या संरक्षक कठड्याला जाऊन धडकला. अपघाताच्या वेळी चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे ट्रक दरीत कोसळला नाही आणि मोठा अनर्थ टळला.या अपघातानंतर ट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. या अपघातामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. यात प्रामुख्याने एसटी बस, इतर मालवाहू ट्रक आणि मोठी वाहने अडकून पडल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. केवळ दुचाकी वाहनांनाच या अडथळ्यातून कसाबसा मार्ग काढणे शक्य होत होते, त्यामुळे काही दुचाकीस्वारांनी अत्यंत सावधगिरी बाळगत आपला प्रवास पुढे सुरू ठेवला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह वाहतूक विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या रस्त्यावर अडकलेला ट्रक बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
konkansamwad 
