मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
वेंगुर्ला
मदर तेरेसा स्कूल, वेंगुर्ला येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी योग प्रशिक्षिका कु. रिद्धी साळगावकर यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित योगसत्रात कु. साळगावकर यांनी विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके करून दाखवली. योगामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्थैर्य आणि निरोगी जीवनशैली कशी जोपासता येते हे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने योगसत्रात सहभाग घेत सर्व आसने केली. शाळेचे मुख्याध्यापक फा. फेलिक्स लोबो यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "योग हा केवळ व्यायाम नाही, तर मन, शरीर आणि आत्म्याचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. प्रत्येकाने नियमित योगाचा सराव करून निरोगी व शिस्तबद्ध जीवन जगावे". या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
konkansamwad 
