मिठमुंबरी जेटीवरून वाद....'कायगो कायाकिंग' शुभारंभाला मच्छीमारांचा विरोध, जेटी वापरावर बंदी

मिठमुंबरी जेटीवरून वाद....'कायगो कायाकिंग' शुभारंभाला मच्छीमारांचा विरोध, जेटी वापरावर बंदी

देवगड 


       देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी येथील जेटीवर 'कायगो कायाकिंग' या जलक्रीडा व्यवसायाच्या शुभारंभावरून निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्र सागरी मंडळाने मिठमुंबरी जेटीच्या वापरावर पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे.२६ ऑक्टोबर रोजी शुभारंभाच्या वेळी स्थानिक मच्छीमार आणि आयोजक यांच्यात वादाची परिस्थिती निर्माण झाली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन देवगड पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यक्रम थांबवला होता.या पार्श्वभूमीवर देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी २६ ऑक्टोबर रोजी सागरी मंडळाला पत्र पाठवून जेटी बंद ठेवण्याची विनंती केली होती. त्यानुसार २७ ऑक्टोबर रोजी सहाय्यक बंदर निरीक्षक कार्यालयाने जेटी बंदीचा आदेश काढला आहे. याबाबत प्रादेशिक बंदर अधिकारी सिंधुदुर्ग, तहसीलदार देवगड, ग्रामपंचायत आणि संबंधित व्यावसायिकांना कळवण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणी देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. १३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १२६(२), १८९(२), १९० आणि ३५१(२) अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जलक्रीडा व्यवसायास अटकाव आणि जलसमाधीची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत आहे.समन्वयातून तोडगा निघेपर्यंत जेटीवरील बंदी कायम राहणार असल्याचे बंदर विभागाने स्पष्ट केले आहे.