सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाची चळवळ उभारणार.....१००० दुधाळ जनावरे आणण्याचे जिल्हा बँकेचे उद्दिष्ट.....मनीष दळवी यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्गात दुग्धव्यवसायाची चळवळ उभारणार.....१००० दुधाळ जनावरे आणण्याचे जिल्हा बँकेचे उद्दिष्ट.....मनीष दळवी यांचे प्रतिपादन

सिंधुदुर्ग 


       जिल्ह्यात दुग्धव्यवसायाचा विस्तार करण्यासाठी दुग्ध संस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि इच्छुक व पात्र शेतकऱ्यांची निवड करावी. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा बँक सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भाईसाहेब सावंत सभागृहात दुधाळ जनावरे खरेदी योजनेबाबत आयोजित बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.यावेळी दळवी म्हणाले, गेल्या वर्षी आंबा आणि काजू पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट आहे. त्यामुळे दुग्धव्यवसायासारखा शेतीपूरक व्यवसाय उभा करणे काळाची गरज आहे. प्रत्येक दुग्धव्यावसायिकाने गावातील आणखी पाच शेतकऱ्यांना जोडून गट तयार करावा. अशा प्रकारे प्रत्येक गावात गट तयार झाल्यास जिल्ह्यात एक हजार दुधाळ जनावरे आणण्याचे उद्दिष्ट सहज साध्य होईल. यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ बँक देईल.लाभार्थी निवडीसाठी शासकीय यंत्रणांची मदत घेता आली असती, मात्र ते लाभार्थी प्रत्यक्ष दुग्धव्यवसायाशी जोडलेले असतीलच याची खात्री नाही. त्यामुळे दुग्ध संस्थांशी संबंधित, अनुभव आणि आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. यंदा पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता जनावरांची काळजी घेणारे लाभार्थी निवडणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी चारा बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असून, चारा लागवडीसाठी अतिरिक्त अनुदान देण्याबाबत विचार सुरू आहे. तसेच सिंधुरत्न योजनेतून पालकमंत्री यांच्याकडून प्रत्येक दूध उत्पादकाला किमान वीस हजार रुपयांचे अतिरिक्त सहकार्य देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली आहे. दूध संकलन वाढवणाऱ्या संस्थांना व्यवस्थापन खर्चासाठी आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे दळवी यांनी स्पष्ट केले.बँकेचा उद्देश नफा मिळवणे नसून शेतकऱ्यांना सक्षम करणे हा आहे. दूध संस्थांच्या सहकार्याने जिल्ह्यात दुग्धव्यवसायाची चळवळ उभी करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करूया, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी संचालक दिलीप रावराणे, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, विविध दुग्ध संस्थांचे प्रतिनिधी व दुग्ध व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.