रत्नागिरीत पत्रकार भवन उभारणीला सुरुवात; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी निधी देणार : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरीत पत्रकार भवन उभारणीला सुरुवात; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी निधी देणार : पालकमंत्री उदय सामंत

 

रत्नागिरी

 

    मिरजोळे एमआयडीसी येथे उभारण्यात येणाऱ्या पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते पार पडले. या पत्रकार भवनात ग्रंथालय, अभ्यासिका, निवास व्यवस्था आणि सभागृहाची सोय असणार असून, येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाही त्यांनी दिली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, प्रांताधिकारी जीवन देसाई, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.डॉ. सामंत म्हणाले की, सुमारे 1 कोटी 36 लाख रुपयांच्या खर्चातून हे पत्रकार भवन उभारले जात असून, या माध्यमातून पत्रकारांच्या मुलांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उत्तम सुविधा मिळणार आहेत. "या भवनातून आयएएस, आयपीएस अधिकारी घडावेत," असा संदेश त्यांनी दिला.सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक पत्रकारितेला नव्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करत त्यांनी आत्मचिंतनाची गरज व्यक्त केली. तसेच पत्रकारितेत आचारसंहितेची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.रत्नागिरीतील पत्रकार भवन आदर्श ठरेल, असे कामकाज व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी शहरातील प्राईम लोकेशनवरील दुसऱ्या पत्रकार भवनासाठीही 5 कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. स्वागत व प्रस्ताविकानंतर मान्यवरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत गोडबोले यांनी केले.