राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणीत आंबेगाव शाळेचे घवघवीत यश
सावंतवाडी
राज्य प्रशिक्षण केंद्र, सोनतळी (जि. कोल्हापूर) येथे दिनांक ३० डिसेंबर २०२५ ते २ जानेवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात आंबेगाव नं. १ शाळेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट पथकाने घवघवीत यश संपादन केले.या शिबिरात आंबेगाव शाळेचे उपक्रमशील व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त स्काऊट मास्टर श्री. नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कु. तनिश तेजस गावडे तसेच आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालय, कुणकेरी (इयत्ता आठवी) येथील कु. प्रवीण सिताराम जंगले, कु. भावार्थ नवलु झोरे आणि कु. आर्यन रवि गावडे यांनी राज्य पुरस्कार चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. विशेष म्हणजे, शाळेच्या इतिहासात प्रथमच स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी उत्तीर्ण होण्याचा मान या विद्यार्थ्यांनी मिळवला आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरपंच श्री. शिवाजी परब, उपसरपंच श्री. रमेश गावडे, मुख्याध्यापक श्री. प्रदीपकुमार म्हाडगुत, आचार्य विनोबा भावे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम. अर्चना सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्रीम. तेजस्वी गावडे, कोलगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीम. भावना गावडे, कोलगाव माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा स्काऊट मास्टर श्री. अरविंद मेस्त्री तसेच आंबेगावमधील पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.या राज्यस्तरीय यशामुळे आंबेगाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

konkansamwad 
