सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'ध्येयधुंद' पुस्तकाचे प्रकाशन १९ फेब्रुवारीला

सुरेश प्रभू यांच्या जीवनप्रवासावर आधारित 'ध्येयधुंद' पुस्तकाचे प्रकाशन १९ फेब्रुवारीला

 

सावंतवाडी

 

     कोकणचे सुपुत्र आणि भारताचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित 'ध्येयधुंद' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या १९ फेब्रुवारीला मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.अॅड. नकुल पार्सेकर लिखित या पुस्तकाचे प्रकाशन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सकाळी ११ वाजता दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात होणार आहे. या दिमाखदार सोहळ्याला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
      सुरेश प्रभू यांचे सुशासन, धोरणात्मक निर्णय आणि लोकभिमुख कार्य या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांसमोर येणार आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत, ज्यामध्ये विख्यात वास्तुविशारद शशी प्रभू, 'एबीपी माझा'चे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, 'कालनिर्णय'चे व्यवस्थापकीय संचालक जयराज साळगावकर आणि ज्येष्ठ सनदी लेखपाल प्रफुल्ल छाजेड यांचा समावेश आहे. स्वामीराज प्रकाशन आणि श्री वर्धमान श्रुतगंगा ट्रस्ट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून रजनीश राणे आणि संजय शाह यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. अॅड. नकुल पार्सेकर यांच्यासह स्वागत समितीने या सोहळ्यासाठी जय्यत तयारी केली असून, सुरेश प्रभू यांच्या चाहत्यांनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.