शिरोडा पंचक्रोशीत अमली पदार्थ विक्रीचा सुळसुळाट......पोलीस अधीक्षकांकडे कठोर कारवाईची मागणी
शिरोडा
शिरोडा पंचक्रोशी परिसरात शाळा, कॉलेज परिसर, पर्यटन क्षेत्र, मैदान, स्मशानभूमी परिसर आणि निर्मनुष्य ठिकाणी अवैधरित्या गांजा, चरस, एम.डी. व इतर अमली पदार्थांची विक्री व सेवन होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून या प्रकरणी महादेव उर्फ अमित गावडे, मयुरेश शिरोडकर, मनोज उगवेकर, राहुल गावडे, संतोष धानजी यांनी सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, काही असामाजिक घटकांकडून दिवसा व रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने अमली पदार्थ विक्री केली जात आहे. यामुळे परिसरातील तरुण, बेरोजगार युवा, शाळकरी व महाविद्यालयीन मुले आणि पर्यटक व्यसनाच्या आहारी जात असून गंभीर परिणाम होत आहेत.संध्याकाळी व रात्री संशयित इसमांची ये-जा वाढल्याने महिला व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींकडून वाद आणि चोरीच्या घटना तसेच वेंगुर्ला तालुक्यात आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.अलीकडेच शिरोडा येथे झालेल्या अमली पदार्थ विरोधी कारवाईतील संशयित आरोपींची पार्श्वभूमी तपासून निपक्षपाती तपास व्हावा, दोषींवर NDPS कायद्यांतर्गत कठोर कारवाई करावी आणि परिसरात पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
konkansamwad 
