गगनबावडा तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेला आग; संगणकांसह फर्निचर जळून खाक

गगनबावडा तहसील कार्यालयाच्या महसूल शाखेला आग; संगणकांसह फर्निचर जळून खाक

 

वैभववाडी

 

     गगनबावडा तहसीलदार कार्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील महसुल शाखेस आज सकाळच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत महसुल शाखेतील तहसीलदार केबिन वगळता अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या टेबलवरील संगणक संच, प्रिंटर, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे व फर्निचरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सुट्टी असल्याने तहसिल कार्यालय कुलूपबंद होते. या कार्यालयात ना शिपाई, ना पहारेकरी, ना सुरक्षारक्षक. त्यामुळे ही आग नेमकी किती वाजता आणि कशी लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही. हा प्रकार रस्त्याने जाणा-या प्रवाशांच्या लक्षात आल्याने ही घटना सर्वांना समजली. घटनेची माहिती समजताच तहसीलदार रुपाली सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी मौसमी चौगले व अन्य अधिकारी दाखल झाले. धुराचा भडका उडाल्याने कार्यालय उघडावे कसे असा प्रश्न पडला होता. पण काच फोडून खिडक्या उघड्या केल्याने आतील अंदाज आला. धुराचे प्रमाण कमी येताच कार्यालयात प्रवेश केला. यावेळी ११ संगणक व प्रिंटर, फर्निचर, वायरींग, फॅन व अन्य साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती समजताच जिल्हाधीकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, सभापती छाया देसाई, उपसभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर कांबळे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.