परुळे ग्रामपंचायतीला राष्ट्रीय स्तरावर सन्मान....नवी दिल्लीतील राष्ट्रीय जलजीवन मिशन कार्यक्रमात सरपंच प्रणीती आबंडपालकर सहभागी
परुळे
राष्ट्रीय जलजीवन मिशन अंतर्गत देशभर साजऱ्या होत अस लेल्या जल महोत्सव पंधरवड्या निमित्त ११ मार्च रोजी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय कार्यक्रम पार पडला. या प्रतिष्ठित कार्यक्रमात वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणीती आबंडपालकर यांना विशेष निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या सहभागामुळे परुळेबाजार ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पातळीवर सन्मान मिळाला आहे.या कार्यक्रमात सरपंच आबंडपालकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्यातील सुमारे ४० हजार ग्रामपंचायतींपैकी केवळ १२ जिल्ह्यातील १२ गावांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये परुळेबाजार ग्रामपंचायतीची निवड झाल्याने हा तालुका व जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित या कार्यक्रमात सरपंच प्रणीती आबंडपालकर यांच्यासोबत ग्रामपंचायत अधिकारी शरद शिंदे हे देखील उपस्थित होते.यापूर्वी परुळे-कर्ली येथे जलजीवन मिशन अंतर्गत जल महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला होता. त्या वेळी केंद्रीय राज्यमंत्री व्हि सोमन्ना तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परुळेबाजार ग्रामपंचायतीने जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या चांगल्या कामाची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.दरम्यान, ८ ते २२ मार्च २०२६ या कालावधीत जलमहोत्सव अंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पाणी संवर्धन, पाणी गुणवत्ता तपासणी, जलस्त्रोतांचे संरक्षण आणि लोकसहभाग वाढविणे यावर या उपक्रमांत विशेष भर दिला जात आहे.गावागावात महिलांना फिल्ड टेस्टिंग किटद्वारे पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. तसेच युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी ‘यंग ब्रिगेड’ स्थापन करण्याची संकल्पनाही राबविण्यात येणार आहे. शाळांमध्ये जलसंवर्धन विषयक स्पर्धा, ग्रामसभांद्वारे जल व्यवस्थापनाचे नियोजन आणि ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाणी संवर्धनाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात येणार आहे.पिण्याच्या पाण्याला सामाजिक आणि सांस्कृतिक प्राधान्य देत जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन, स्वच्छता आणि पाणी पुरवठा योजनांची देखभाल यावर विशेष भर देण्यात येणार आहे. आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरण यांना जलसेवेशी जोडण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली. परुळेबाजार ग्रामपंचायतीची राष्ट्रीय कार्यक्रमासाठी झालेली निवड ही संपूर्ण वेंगुर्ले तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

konkansamwad 
