सभागृहाला डावलून शिक्षकांना कार्यमुक्त केल्याने जिल्हा परिषदमध्ये खडाजंगी....आयुक्तांकडे तक्रारीचा इशारा
सिंधुदुर्गनगरी
आंतरजिल्हा बदली झालेल्या आणि राजीनामा दिलेल्या शिक्षकांना सभागृहाला विश्वासात न घेता कार्यमुक्त केल्याच्या मुद्द्यावरून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत सोमवारी जोरदार वादळी चर्चा रंगली. प्राथमिक शिक्षणाधिकारी सुबोध माने यांनी सुमारे आठ ते दहा शिक्षकांना कार्यमुक्त केल्याची माहिती देताच, सभागृह व पदाधिकाऱ्यांना अंधारात का ठेवले, असा संतप्त सवाल अध्यक्ष प्रमोद कामत यांनी केला. राजीनामा दिलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी प्रशासनाने इतका पुढाकार का घेतला, यामागील हेतू स्पष्ट करावा, अशी मागणी करत सदस्य संदेश सावंत यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. राजीनामे नामंजूर करता येतात का आणि जिल्ह्यावर होणारा अन्याय वरिष्ठांपर्यंत कसा पोहोचवायचा, यावर सदस्यांनी खडाजंगी चर्चा केली. यापुढे एकाही शिक्षकाला कार्यमुक्त करू नये, तसेच बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या २८ कर्मचाऱ्यांनाही कार्यमुक्त करण्यास मनाई असल्याचे स्पष्ट आदेश अध्यक्ष कामत यांनी दिले; तर सभागृहाला डावलून निर्णय घेतल्यास आयुक्तांकडे तक्रार करण्याचा इशारा संदीप गावडे यांनी दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अनुपस्थित असल्याने काही महत्त्वाचे निर्णय प्रलंबित ठेवण्यात आले. याच सभेत इतर विविध प्रश्नांवरही कडाक्याची चर्चा झाली. शिक्षकांना सतत प्रशिक्षणात गुंतवून न ठेवता शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणावर भर द्यावा, अशी मागणी सुमेधा पाताडे यांनी केली; तर पवित्र पोर्टलवर एकाच उमेदवाराचे अनेक ठिकाणी अर्ज येत असल्याने स्थानिक उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे संदेश सावंत आणि रूपेश कानडे यांनी निदर्शनास आणून दिले, ज्यावर सभागृहाचा ठराव घेण्याचे निर्देश देण्यात आले. उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शालेय वाटेवरील झाडे व रस्ता बंद करण्याचा विषय, तसेच नेरूर येथील मागासवर्गीय वस्तीचा बंद रस्ता आणि अपूर्ण माहितीबद्दल रूपेश कानडे यांनी संताप व्यक्त करत हा मुद्दा पुढील सभेत पुन्हा मांडण्याचे स्पष्ट केले. ग्रामपंचायतींच्या नादुरुस्त सायकली संबंधित पुरवठादाराकडूनच मोफत दुरुस्त करून घ्याव्यात, अशी सूचना संदीप गावडे यांनी केली; तर अनुपस्थित महामार्ग अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले. तसेच स्वनिधी योजनेतील तीन अपत्यांची अट रद्द करण्याचा ठराव सुमेधा पाताडे यांच्या मागणीनुसार मंजूर करण्यात आला.
konkansamwad 
