शेकरू, वानरांच्या धुमाकूळमुळे आंबा-नारळ बागांचे नुकसान....शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शेकरू, वानरांच्या धुमाकूळमुळे आंबा-नारळ बागांचे नुकसान....शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी


         वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली व परिसरातील गावांमध्ये शेकरू म्हणजेच Indian Giant Squirrel, वानर व इतर वन्य प्राण्यांनी आंबा, नारळ, काजू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याची तक्रार शेतकरी संघर्ष समिती दाभोली व सर्व बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे. या संदर्भात समितीचे अध्यक्ष संतोष यशवंत गोखले यांनी दि. 22/06/2026 रोजी प्रांत कार्यालय सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.  
       निवेदनात म्हटले आहे की, अलीकडील काळात दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी बागांमध्ये घुसून वन्य प्राणी फळे कुरतडत आहेत. झाडांचे नुकसान करून उत्पादन पूर्णपणे नष्ट करत आहेत. या सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून अनेक शेतकरी गंभीर आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेती हाच एकमेव उदरनिर्वाहाचा मार्ग असताना या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मानसिक व आर्थिक ताण वाढला आहे. या बाबत स्थानिक प्रशासन व वनविभागाकडे वारंवार तोंडी व लेखी निवेदने देऊनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी खंत समितीने व्यक्त केली.त्यामुळे संबंधित वनविभाग व इतर शासकीय यंत्रणांशी समन्वय साधून तात्काळ पंचनामे, नुकसान भरपाई, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि पिकांच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनून परिस्थिती नाईलाजाची झाल्यास शेतकरी पर्यायी मार्गाचा विचार करण्यास भाग पडतील, असा इशाराही समितीने दिला आहे.यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक, संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष गोखले, उमेश प्रभूखानोलकर मनाली हळदणकर, अण्णा जोशी, किशोर पेडणेकर, प्रल्हाद हळदणकर, केतन प्रभू खानोलकर, दाविद आल्मेडा, बाबल्या कांबळी, श्रीकृष्ण माडये, स्मिता प्रभूदाभोलकर, शैलजा राजापूरकर उपस्थित होते.