माडखोल-धवडकी परिसरात बिबट्याची दहशत, वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी

माडखोल-धवडकी परिसरात बिबट्याची दहशत, वनविभागाकडे बंदोबस्ताची मागणी

सावंतवाडी


       माडखोल आणि धवडकीच्या सीमेवरील बेबीवाडी भागात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे स्पष्ट झाल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दीपक देसाई यांना रस्त्यालगत काही अंतरावर बिबट्या दिसून आला. कोणतीही घबराट न करता प्रसंगावधान राखत त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याचे फोटो काढले. अचानक बिबट्या नजरेस पडल्याने बेबीवाडीसह संपूर्ण माडखोल-धवडकी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याच्या सातत्याच्या वावरामुळे जनावरे चराईसाठी नेणेही धोकादायक बनले असून, शेतकरी आणि ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वीच धवडकीच्या वनश्री भागात चरत असलेल्या एका वासरावर बिबट्याने झडप घातली होती; सुदैवाने वासराने चपळाई दाखवत स्वतःचा जीव वाचवला. मागील चार वर्षांपासून या भागात बिबट्याचा वावर सुरू असून, अनेकदा त्याच्या डरकाळ्याही कानावर पडत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. वन्यप्राण्यांचा वाढता धोका लक्षात घेऊन वनविभागाने तातडीने लक्ष घालून योग्य तो बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.