कुडाळमध्ये 'केपीएल अश्वमेध' गौरवग्रंथाचे उत्साहात प्रकाशन
कुडाळ
कुडाळदेशकर ज्ञातीबांधवांना आनंद आणि समाधान देणाऱ्या 'केपीएल' (कुडाळदेशकर प्रीमियर लीग) या उपक्रमाने समाजात एकोपा व आपलेपणा निर्माण केला आहे. समाजातील ही सांघिक भावना कायम टिकवून ठेवण्यासाठी ही स्पर्धा अखंडपणे सुरू राहिली पाहिजे आणि त्यासाठी लागणारी सर्व जबाबदारी स्वीकारण्यास आपण तयार आहोत, अशी ठाम ग्वाही राज्याचे उद्योगमंत्री तथा केपीएल कोअर कमिटीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली. या स्पर्धेतून किमान एक तरी दर्जेदार खेळाडू घडवावा, त्याच्या पुढील कारकिर्दीची संपूर्ण जबाबदारी मी घेईन, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. गौड ब्राह्मण सभा आणि कुडाळदेशकर आद्य गौड ब्राह्मण प्रतिष्ठान (सिंधुदुर्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै शिक्षण संस्था संकुलात 'केपीएल अश्वमेध २०२५' गौरवग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानावरून उदय सामंत बोलत होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून 'तरुण भारत संवाद'च्या सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, बॅ. नाथ पै प्रशिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सेवानिवृत्त पर्यवेक्षिका सुलभा देसाई, 'व्याध' साप्ताहिकाच्या संपादिका संजीवनी देसाई, प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित देसाई, गौड ब्राह्मण सभेचे कार्याध्यक्ष मनीष दाभोलकर, जिल्हा परिषद सदस्या आरती पाटील, वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई आणि पंचायत समिती सदस्य मंगेश उर्फ भाऊ प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. बॅ. नाथ पै महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नांदीने आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत पुण्यातील ज्ञातीबांधवांनी एकत्र येत मोठ्या मेहनतीने केपीएलचा हा वटवृक्ष उभा केला आहे. समाजातील वंचित घटकांनाही अशा उपक्रमांमध्ये सामावून घेतले पाहिजे. केपीएलकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहावे आणि खेळाडूंनी देशपातळीवरील मोठ्या टेनिस स्पर्धांमध्ये खेळण्याइतकी गुणवत्ता निर्माण करावी. तसेच, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी रत्नागिरी येथे लवकरच यूपीएससी व एमपीएससी अकादमी सुरू करण्यात येणार असून, सिंधुदुर्गातील तरुणांनी त्याचा लाभ घेऊन उच्च पदांवर अधिकारी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यासोबतच मराठी मातृभाषेनंतर आपल्या मालवणी बोलीभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे. आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी कौशल्य विकास केंद्र सुरू केले जाईल. या केंद्रात मालवणी भाषेचा समावेश असेल, तसेच मालवणी शब्दकोश तयार करण्याचीही संकल्पना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रमुख पाहुणे शेखर सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, क्रिकेटमध्ये वैयक्तिक कौशल्याइतकीच संघभावना महत्त्वाची असते आणि हीच भावना समाजाला अधिक मजबूत करते. तरुणांचा उत्साह, सकारात्मकता आणि खिलाडूवृत्तीमुळे केपीएलचा दहा वर्षांचा प्रवास यशस्वी झाला असून, या प्रवासातील मैत्री व आठवणींचा इतिहास जपणारा हा गौरवग्रंथ आहे. गौरवग्रंथाच्या निर्मितीमागील भूमिका स्पष्ट करताना मनीष दाभोलकर म्हणाले की, केपीएलच्या दहा वर्षांच्या प्रवासातील महत्त्वाचे प्रसंग या ग्रंथात अभ्यासपूर्ण व शिस्तबद्ध पद्धतीने मांडले आहेत. भविष्यात जेव्हा कुडाळेश्वरचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा केपीएल आणि या अश्वमेध गौरवग्रंथाचा उल्लेख 'सुवर्णकाळ' म्हणून केल्याशिवाय तो पूर्ण होणार नाही. प्रास्ताविकात रणजित देसाई यांनी ग्रंथनिर्मितीसाठी घेतलेल्या मेहनतीची माहिती देत प्रतिष्ठानच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या समाजभवनासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. केपीएलच्या दहा वर्षांच्या पर्वात तीन वर्षे सिंधुदुर्गात स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यात गौरवग्रंथाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. पूजा सामंत, ज्येष्ठ पत्रकार अनंत सामंत, वेदिका दाभोलकर आणि उमाकांत सामंत यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. याप्रसंगी दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, केपीएलचे कार्यकर्ते आणि ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
