देवबागमध्ये पोलिसांचा छापा .....२.२० लाखांची अवैध गोवा बनावटीची दारू जप्त....एकावर गुन्हा दाखल!
मालवण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या देवबाग किनारपट्टी परिसरात अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी धडक कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या या छाप्यात गोवा बनावटीच्या दारूचा भलामोठा साठा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून, या कारवाईने बेकायदेशीर दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, देवबाग परिसरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची मोठी साठवणूक आणि विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस यंत्रणेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित ठिकाणी अचानक छापा टाकला. या अचानक झालेल्या कारवाईमुळे दारू माफियांची चांगलीच तारांबळ उडाली. छाप्यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गोवा बनावटीच्या दारूचे तब्बल ४६ बॉक्स ताब्यात घेतले. या जप्त करण्यात आलेल्या दारू साठ्याची एकूण किंमत तब्बल २ लाख २० हजार ८०० रुपये इतकी असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्थानिक रहिवाशी कॅलीस डॉमिनिक डिसोजा (रा. देवबाग, ता. मालवण) याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करून कारवाईचा बडगा उगारला आहे. पर्यटनाच्या आडून चालणाऱ्या अशा अवैध धंद्यांवर पोलिसांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेचे स्थानिक नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. सदर कारवाई सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक दीपक शेलार यांच्या नेतृत्वाखालील मालवण पोलीस ठाण्याच्या पथकाने ही धडक कामगिरी केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत, हेड कॉन्स्टेबल सुहास पांचाळ, हेड कॉन्स्टेबल सुप्रिया पवार आणि हेड कॉन्स्टेबल सोनाली पाटकर यांचा समावेश होता. तालुक्यातील अवैध धंदे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यापुढेही अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील, असा इशारा पोलीस यंत्रणेकडून देण्यात आला आहे.
konkansamwad 
