जिल्हास्तरीय काजू परिसंवाद दोडामार्ग येथे उत्साहात संपन्न

जिल्हास्तरीय काजू परिसंवाद दोडामार्ग येथे उत्साहात संपन्न

दोडामार्ग

 

        प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला आणि काजू व कोको विकास संचनालय, कोची यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय काजू परिसंवादाचे झरेबांबर, दोडामार्ग येथे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाची सुरूवात प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथील कनिष्ठ काजू पैदासकार प्रा. एल. एस. खापरे,वरिष्ठ संशोधन सहाय्यक एस. एस. भुरे, काजू बागायतदार संघ अध्यक्ष संजय देसाई, अर्जुन आयनोडकर, उपसरपंच श्रीधर लूयाजी सावंत, मंडळ कृषि अधिकारी प्रकाश घाटगे, पोलिस पाटील प्रमोद सावंत यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करून आणि विद्यापीठ गीत व राज्यगीताने करण्यात आली. प्रा. एल. एस. खापरे यांनी कार्याक्रमाच्या प्रस्ताविकामध्ये काजू परीसंवादाच्यामागील भूमिका विशद केली. संजय देसाई  यांनी कोंकण कृषि विद्यापीठाचे काजू व कृषिविषयक संशोधनविषयी शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले. तसेच प्रगतशील शेतकरी भेडशी कृष्णा मोरजकर यांनी सेंद्रिय शेतीविषयी भूमिका मांडली. तांत्रिक सत्रामध्ये प्रा.ललित खापरे, यांनी बदलत्या वातावरणानुसार काजू वाणांची लागवड व नुकतीच विद्यापीठामार्फत ओल्या काजुगारासाठी विकसित करण्यात आलेल्या वेंगुर्ला-१० एम बी या वाणाची आणि काजू रोपवाटिका व्यवस्थापनाची माहिती दिली. सचिन भुरे, यांनी विद्यापीठाचे कृषि तंत्रज्ञान माहितीसाठी विद्यापीठाचे युटयुब चॅनल व अॅप या विषयी शेतकऱ्यांना अवगत केले. डॉ. गोपाळ गोळवणकर यांनी काजू वरील कीड व रोग व्यवस्थापन आणी त्यावरील उपाय या विषयाची सविस्तर माहिती सादरीकरणातून दिली. प्रकाश घाटगे यांनी कृषि विभागाच्या विविध योजनेविषयी शेतकऱ्यांना माहिती देऊन योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.सदर कार्यक्रमासाठी झरेबांबर, भेडशी तसेच तालुक्यातील गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना काजू लागवडीचे सुधारित तंत्रज्ञान व काजूच्या सुधारित जाती या घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले. प्रकाश घाटगे यांनी उपस्थित मान्यवरांचे तसेच शेतकरी व ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांनी आणि सहभागी प्रशिक्षणार्थीनी सुद्धा या स्तुत्य उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे आणी आयोजकांचे आभार मानले. आयोजनामध्ये प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक, डॉ. ए. पी. चव्हाण, एल. एस. खापरे, डी. जे. वाघ, डॉ. गोपाल गोळवणकर, वृषाली परब, प्रकाश घाटगे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला सौरभ कदम, तालुका कृषी अधिकारी, किशोर वाघमोडे, कृषी अधिकारी व  प्रसाद खडपकर कृषी पर्यवेक्षक, दोडामार्ग उपस्थित होते. श्रीधर लूमाजी सावंत यांनी या पद्धतीचा कार्यक्रम गावामध्ये घेतल्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.