पुणे कोर्टाबाहेरच गोळीबार आणि कोयत्याने हल्ला, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
पुणे
पुणे आज गोळीबाराच्या घटनेने हादरले आहे. पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 बाहेर ही घटना घडली आहे. गोळीबारासोबत कोयत्याने सुद्धा हल्ला झाला आहे.पुण्यात आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात कायदा सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. कारण चक्क पुणे कोर्टाच्या परिसरातच गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपींनी कोर्ट परिसरात एका व्यक्तीवर गोळीबार केला. ती व्यक्ती स्वतःचा बचाव करून पळत असताना कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यात त्या पीडित व्यक्तीचे दोन हात शरीरापासून वेगळे झाले आहेत. ही खूप भयानक घटना आहे.पुणे शिवाजीनगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर 4 च्या परिसरात ही घटना घडली आहे. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, ती जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार हल्ल्यात जखमी व्यक्ती हत्येच्या प्रकरणातील आरोपी आहे. मंदार किवळे असे जखमीचे नाव आहे. तो शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.ज्या व्यक्तीवर गोळीबार झाला, ती व्यक्ती पळत असताना त्याचा पाठलाग करून कोयत्याने हल्ला करण्यात आला. शिवाजीनगर कोर्ट ते फॅमिली कोर्टाच्या परिसरात हे घडले आहे. आज सकाळीच सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोयता गँगची दहशत दिसली होती. कोयता गँग अस्तित्वात नाही असे पोलिसांकडून सांगितले जाते. पण वास्तव मात्र तसे नाहीये. दिवसाढवळ्या अशा प्रकारचे हल्ले होत आहेत.पोलिसांचा गुंडांवर काही वचक राहिलाय की नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शिवाजीनगर कोर्टाच्या गेट नंबर 4 च्या परिसरात नेहमी नागरिकांची वर्दळ असते, अशा ठिकाणी हा हल्ला झाला आहे.या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
konkansamwad 
