वेंगुर्ला तुळस घाटीत रिक्षेचा अपघात

वेंगुर्ला
मळगाव येथून वेंगुर्ला येथे येणाऱ्या रिक्षेचा तुळस घाटीतील उतारावर ब्रेक फेल झालेल्या अपघातात वायंगणी येथील आराध्या आदेश साळगावकर (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातात त्यांचा कमलाकांत आदेश साळगावकर हा पाच वर्षाचा बालक मात्र थोडक्यात बचावला. अपघातात जखमी झालेले रिक्षाचालक व अन्य महिला या दोघांवर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.
दाभोली येथील रिक्षा चालक रुपेश सखाराम माडकर (वय ४४) हे रिक्षेने मळगाव ते वायंगणी असे प्रवासी भाडे घेऊन निघाले होते. यात सौ. साळगावकर व त्यांच्या भगिनी सौ. ऋतुजा राजा कुडाळकर (वय २८) व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा रोहन राजा कुडाळकर अशी माणसे प्रवास करत होती. तुळस घाटीतील मोठ्या उतारावर येताच रिक्षेचे ब्रेक फेल झाल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात आराध्या साळगावकर, ऋतुजा कुडाळकर व रिक्षाचालक रुपेश माडकर यांच्या डोक्याला दुखापत झाली. खासगी वाहनाने जखमींना वेंगुर्ल्यातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.आराध्या या गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोवा येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यानंतर वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले, हेडकॉन्स्टेबल रूपा वेंगुर्लेकर, रंजिता चव्हाण, बंटी पालकर व महिला पोलीस कुंभे यांनी उपजिल्हा रुग्णालयात येत जखमींची भेट घेत अपघाताबाबत माहिती घेतली.