दुष्काळाला मात देण्यासाठी मळगावच्या महिलांचा स्तुत्य उपक्रम: श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

दुष्काळाला मात देण्यासाठी मळगावच्या महिलांचा स्तुत्य उपक्रम: श्रमदानातून उभारला वनराई बंधारा

सावंतवाडी


   एल निनोच्या प्रभावामुळे उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील महिलांनी एकत्र येत एक नवा आदर्श घालून दिला आहे. गावातील ज्योती ग्रामसंघांतर्गत असलेल्या जान्हवी, जागृती आणि लक्ष्मी बचत गटांच्या महिलांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने मळगाव रेडकरवाडी येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची यशस्वी उभारणी केली आहे. या जलसंधारण उपक्रमामुळे परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांची भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.कडक उन्हाचा पाडाव आणि भूगर्भातील खालावलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन महिलांनी हा जलसंधारणाचा मार्ग निवडला. रेडकरवाडी येथील नैसर्गिक झरीच्या वरच्या भागात सिमेंटच्या पिशव्यांचा वापर करून हा बंधारा बांधण्यात आला. महिलांच्या या उपक्रमात रेडकरवाडीतील ग्रामस्थांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमासाठी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी, तसेच सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती राजू परब यांचे विशेष सहकार्य लाभले. बंधाऱ्यात साचणारे पाणी जमिनीत मुरल्याने आगामी काळात तीव्र पाणीटंचाईपासून परिसराला मोठा दिलासा मिळणार आहे. महिलांच्या या स्वावलंबी आणि सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.