कणकवलीच्या जुन्या भाजी मार्केटच्या विस्तारासाठी महसूल विभागाची जागा द्या......माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची महसूलमंत्र्यांकडे मागणी
कणकवली
कणकवली शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथील जुन्या भाजी मार्केटच्या विकासासाठी लगतची महसूल विभागाची जागा नगरपंचायतीला वर्ग करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.कणकवली नगरपंचायत हद्दीतील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे जुने भाजी मार्केट आहे. त्याला लगत स.नं./हि.नं. 198 व 1 क्षेत्र 0.07 ही जागा महसूल विभागाच्या मालकीची आहे. ही जागा भाजी मार्केटमध्ये वर्ग केल्यास कणकवली भाजी मार्केट सुसज्ज होऊ शकते, असे निवेदनात म्हटले आहे.या संदर्भातील पत्रव्यवहार कोकण आयुक्त व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना करण्यात आला आहे. तरी आपण आपल्या अधिकारात या जागेबाबत लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन ती जागा नगरपंचायतीला वर्ग करावी, अशी विनंती श्री. नलावडे यांनी मंत्री बावनकुळे यांना केली.यावेळी नलावडे यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष मेघा गांगण, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, निखिल आचरेकर, राजा पाटकर आदी उपस्थित होते.
konkansamwad 
