देवगड किल्ल्याच्या खंदकात १ कोटींचे नयनरम्य गार्डन होणार
देवगड
सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रात आणखी एक सुवर्ण अध्याय जोडला जात असून ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकामध्ये तब्बल १ कोटी रुपये खर्चाचे आकर्षक आणि आधुनिक गार्डन साकारले जाणार आहे. महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वपूर्ण प्रकल्प प्रत्यक्ष आकार घेत आहे. विशेष म्हणजे, हे संपूर्ण गार्डन शासकीय जागेवरच उभारले जाणार असल्याने भूसंपादनाची कोणतीही अडचण उरलेली नाही आणि कामाचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. या नव्या बागेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे खंदकातून दिसणारे अरबी समुद्राचे अथांग आणि विहंगम दृश्य असणार आहे. एकाच ठिकाणी ऐतिहासिक वास्तूचे भव्यपण, नयनरम्य हिरवळ आणि अथांग समुद्र यांचा दुर्मिळ संगम पर्यटकांना पाहायला मिळणार आहे. यापूर्वी देवगडमध्ये उभारण्यात आलेल्या पवनचक्की गार्डनने शहराला पर्यटन नकाशावर एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. आता या नव्या प्रकल्पामुळे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा देवगड किल्ला, देवगड खाडी, खंदकातील गार्डन, समुद्रकिनारा आणि पवनचक्की असा एक समृद्ध 'टुरिझम बेल्ट' तयार होत आहे. या पर्यटन साखळीमुळे देश-विदेशातील पर्यटकांचा ओघ वाढून स्थानिक हॉटेल्स, वाहतूक व्यावसायिक, पर्यटन मार्गदर्शक आणि लघुउद्योजकांना मोठा रोजगार उपलब्ध होणार असून, ऐतिहासिक वारशाला आधुनिकतेची जोड देणारा हा प्रकल्प देवगडच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.
konkansamwad 
