देवगड तालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा; गारपिटीने आंबा-काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले
देवगड
देवगड तालुक्यात निसर्गाचा मोठा कोप पाहायला मिळाला आहे. दिवसभर असह्य उकाडा अनुभवल्यानंतर सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार गारपिटीने ग्रामीण भागाला झोडपून काढले. या नैसर्गिक आपत्तीमुळे हाताशी आलेल्या हापूस आंबा आणि काजू पिकाचे अतोनात नुकसान झाले असून बागायतदार हवालदिल झाला आहे. सकाळपासूनच तालुक्यात उन्हाचा कडाका प्रचंड होता. वाढलेल्या आर्द्रतेमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले होते. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला. विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. नारिंग्रे, मिठबांव, कातवण, तळेबाजार आणि शिरगांव या परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. अनेक ठिकाणी पावसासोबत मोठ्या गारा पडल्याने सर्वत्र पांढरी चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळाले.गारांच्या मारामुळे तयार झालेल्या आंब्याचे मोठे नुकसान झाले असून फळगळती वाढली आहे. पावसामुळे फळांवर डाग पडण्याची आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.निसर्गाच्या या लहरीपणामुळे देवगडच्या मुख्य पिकाला मोठा फटका बसला असून, नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
konkansamwad 
