चिरेखाण व्यावसायिकांना मोठा दिलासा; आमदार निलेश राणेंच्या मध्यस्थीने गोवा–सिंधुदुर्ग दरवाद अखेर मिटला

चिरेखाण व्यावसायिकांना मोठा दिलासा; आमदार निलेश राणेंच्या मध्यस्थीने गोवा–सिंधुदुर्ग दरवाद अखेर मिटला

 

सावंतवाडी

 

      तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक आणि गोव्यातील व्यापारी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला चिऱ्यांच्या वाढीव दराचा वाद अखेर मिटला आहे. शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी मध्यस्थी करत यावर योग्य तोडगा काढल्याने चिरेखाण व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या यशस्वी मध्यस्थीबद्दल सावंतवाडीतील चिरेखाण व्यावसायिकांनी आमदार निलेश राणे यांचे विशेष आभार मानले असून सावंतवाडीत त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्गातील चिरेखाण व्यावसायिक आणि गोव्यातील व्यापारी यांच्यात दरावरून मतभेद सुरू होते. दोन्ही बाजूंनी अनेक बैठका होऊनही तोडगा निघत नसल्याने स्थानिक चिरेखाण व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत होते. या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांचे लक्ष वेधले. त्यानंतर संजू परब यांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे या विषयात हस्तक्षेप करून मार्ग काढण्याची विनंती केली होती.विषयाचे गांभीर्य ओळखून आमदार राणे यांनी तात्काळ गोव्याचे आमदार आर्लेकर यांच्या निवासस्थानी दोन्ही बाजूंच्या घटकांची संयुक्त बैठक घेतली.या बैठकीत चिरेखाण व्यावसायिकांची बाजू ठामपणे मांडत, त्यांना वाढीव दर मिळालाच पाहिजे असा आग्रह आमदार राणेंनी धरला. त्यांच्या या आक्रमक आणि सकारात्मक भूमिकेमुळे व्यापाऱ्यांनी वाढीव दर देण्याचे मान्य केले.या यशस्वी मध्यस्थीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावंतवाडी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, उपजिल्हाप्रमुख झेवियर फर्नांडीस यांच्यासह तालुक्यातील चिरेखाण व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार निलेश राणे आमच्या चिरेखाण व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यामुळेच हा जटिल प्रश्न निकाली निघाला आहे, तसेच संजू परब यांनीही यात मोलाचे सहकार्य केले आहे. या मदतीची जाणीव ठेवून सर्व चिरेखाण व्यावसायिक भविष्यात आमदार निलेश राणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील आणि ते घेतील तोच निर्णय अंतिम असेल, असा विश्वास जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर यांनी या वेळी व्यक्त केला.