मालवण शहरातील देऊळवाडा सोमवार बाजार बंद करण्यास नागरिकांचा ठाम विरोध
मालवण
देऊळवाडा येथे गेल्या सहा वर्षांपासून नियमितपणे भरत असलेला सोमवारचा आठवडा बाजार नागरिकांच्या अत्यंत सोयीचा असून तो कोणत्याही परिस्थितीत बंद करण्यात येऊ नये, अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. यासंदर्भात देऊळवाडा, वायरी, आडवण, रेवतळे या परिसरातील नागरिकांनी आज मालवण नगर परिषदेत जात नगराध्यक्ष ममता वराडकर आणि मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर केले.काही दिवसांपूर्वी काही व्यक्तींनी वाहतूक समस्या व इतर कारणांचे दाखले देत हा बाजार बंद करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर, जनमत आणि ग्राहक हित विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेऊ नये, अशी आग्रही विनंती नागरिकांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, अधीक्षक संध्या गवळी, पूनम चव्हाण, नीना मुंबरकर, भाग्यश्री मयेकर, ललित चव्हाण, सिद्धार्थ जाधव यांच्यासह देऊळवाडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.देऊळवाडा सागरी महामार्ग हे ठिकाण मालवण शहरासह लगतच्या कोळंब, न्हिवे, आडारी, कातवड, खैदा, कुंभारमाठ, घुमडे, वायरी, देवली, तारकर्ली, देवबाग, हडी, कांदळगाव आणि ओझर या गावांतील लोकांसाठी मध्यवर्ती आहे. विशेषतः महिला आणि वयोवृद्धांसाठी हे ठिकाण अत्यंत सोयीस्कर ठरत आहे. बाजाराच्या दिवशी वाहतूक कोंडी होत असल्याचा दावा फेटाळत नागरिकांनी स्पष्ट केले की, हा बाजार फक्त काही तासांसाठीच भरतो.वाहतुकीची समस्या उद्भवल्यास अवजड वाहनांना ठराविक वेळेत बंदी घालणे किंवा आडारी रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करणे अशा उपाययोजना कराव्यात. वाहतुकीचे कारण देऊन बाजार बंद करणे संयुक्तीक नाही.बाजाराच्या ठिकाणापासून एस.टी. स्टँड, रिक्षा स्टँड आणि बस थांबे अगदी जवळ असल्याने सर्वसामान्यांचा वाहतूक खर्च वाचतो. तसेच गेल्या ६ वर्षांत या ठिकाणी पाकिटमारी किंवा कोणतीही अनुचित घटना घडलेली नसून हे ठिकाण पूर्णपणे सुरक्षित आहे.विशिष्ट व्यक्तींच्या मागणीवरून हा बाजार बंद करणे लोकाभिमुख ठरणार नाही. बाजार बंद करण्यासाठी आग्रही असणाऱ्यांकडून सोमवारी कायदा हातात घेण्याचे कृत्य होणार नाही याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, तसेच व्यापाऱ्यांपेक्षा 'ग्राहक हित' प्राधान्याने विचारात घ्यावे.नागरिकांनी सादर केलेल्या या निवेदनाची गंभीर दखल घेऊन ही बाब तहसीलदार यांच्याही निदर्शनास आणून द्यावी, अशी विनंती निवेदनकर्त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी देऊळवाडा व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
konkansamwad 
