खात्यात रक्कम नसताना धनादेश दिल्याच्या आरोपातून महिलेची निर्दोष मुक्तता....आरोपींच्या वतीने अॅड. अनिल केसरकर यांचा यशस्वी युक्तीवाद
सावंतवाडी
खात्यात पुरेशी रक्कम नसताना सुमारे 3 लाख 76 हजार रुपयांचा धनादेश देऊन फसवणूक केल्याच्या आरोपातून प्राजक्ता आकेरकर यांची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. पी. पाटील यांच्या न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड. अनिल केसरकर यांनी यशस्वी युक्तीवाद केला.फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, फिर्यादी आणि आरोपी प्राजक्ता आकेरकर यांच्या पतीची व्यवसायानिमित्त ओळख होती. या ओळखीतून आरोपीने आपल्या पतीला पैशांची गरज असल्याचे सांगून सुमारे 1 वर्षाच्या कालावधीत फिर्यादी यांच्याकडून हातउसने म्हणून 3 लाख 76 हजार रुपये घेतले.मात्र नंतर वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने आरोपीने फिर्यादीला सदर रकमेचा धनादेश दिला. फिर्यादीने तो धनादेश बँकेत जमा केला असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने धनादेश अनादर होऊन परत आला. यानंतर पाठविलेल्या नोटीसलाही आरोपीने उत्तर दिले नाही, असा आरोप करत फिर्यादीने सावंतवाडी प्रथमवर्ग न्यायालयात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.सुनावणीदरम्यान फिर्यादीच्या जबाबात विसंगती असल्याचे आणि फिर्यादीने आरोपीला दिलेली रक्कम सबळ पुराव्याने सिद्ध करू न शकल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. तसेच आरोपीने दिलेला धनादेश अन्य कारणासाठी दिला होता हे आरोपी पक्षाने सिद्ध केले.या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने आरोपी प्राजक्ता आकेरकर यांची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपींच्या वतीने अॅड. अनिल केसरकर यांनी बाजू मांडून यशस्वी युक्तीवाद केला.
konkansamwad 
