कोकणच्या दशावतार कलेचा गणेशमूर्तीतून सुरेख आविष्कार

कोकणच्या दशावतार कलेचा गणेशमूर्तीतून सुरेख आविष्कार

मालवण

 

     कोकणच्या मातीतील पारंपरिक दशावतार कलेचे आकर्षण सर्वांनाच आहे. याच कलेचा सुंदर आविष्कार यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील भाविकांना पाहायला मिळणार आहे. मालवण येथील श्री गणेश चित्रशाळेतील युवा मूर्तिकार हेमंत रामाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी दशावतारी पोशाखातील सुमारे साडेसहा फूट उंचीची आकर्षक गणेशमूर्ती साकारली असून, ही मूर्ती परेलच्या तकदीर टेरेस मित्र मंडळाकडे रवाना झाली आहे.यंदाच्या गणेशोत्सवात श्री गणेश चित्रशाळेतून मुंबईला रवाना होणारी ही पहिलीच मूर्ती ठरली आहे. कोकणातील पारंपरिक दशावताराची ओळख आणि गणेशमूर्तीचे कलात्मक रूप यांचा सुरेख संगम या मूर्तीमध्ये साधण्यात आला आहे.परेल तकदीर टेरेस मित्र मंडळाने यंदा ‘कोकणातील पारंपरिक दशावतार’ या विषयावर गणेशमूर्ती साकारण्याची संकल्पना मांडली होती. मंडळाच्या वतीने किशोर कांदळगावकर यांनी ही संकल्पना मूर्तिकार हेमंत रामाडे यांच्यासमोर मांडली आणि रामाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिला प्रत्यक्षात मूर्त रूप दिले.ही मूर्ती साकारण्यासाठी सुमारे सात ते आठ दिवसांचा कालावधी लागला. वेळेत काम पूर्ण करण्यासाठी मूर्तिकार व सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. दशावतारातील पारंपरिक वेशभूषा, कलात्मक बारकावे आणि गणेशरूप यांचा योग्य मेळ साधत ही अनोखी कलाकृती साकारण्यात आली आहे.श्री गणेश चित्रशाळेने यापूर्वीही तकदीर टेरेस मित्र मंडळासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनांवर मूर्ती साकारल्या आहेत. २०१० मध्ये २१२१ मोदकांची संकल्पना असलेली मूर्ती, तसेच आयर्लंड येथील गार्डनमध्ये तबला वादन करणाऱ्या स्वरूपातील गणेशमूर्ती आणि कापसाच्या मोदकांची संकल्पना असलेली मूर्तीही येथे साकारण्यात आली होती.ही साडेसहा फुटी मूर्ती मालवण येथून ट्रान्सपोर्ट वाहनातून मुंबईकडे रवाना करण्यात आली आहे. कोकणच्या पारंपरिक दशावतार कलेला गणेशमूर्तीच्या माध्यमातून मुंबईत वेगळ्या स्वरूपात सादर करण्याचा प्रयत्न या कलाकृतीतून करण्यात आला आहे.ही मूर्ती साकारण्यासाठी राकेश वेंगुर्लेकर, योगेश परब, हर्षद तळवडेकर, अतुल सांडव, सिद्धार्थ परब, गौरी मेस्त्री, निनाद आडकर, वैभव खूर्दे, साई दांडकर, योगिता रामाडे, दीप मुंबरकर, गौरांग कोचरेकर, पार्थ आचरेकर, दर्शन गांवकर, चेतन केणी, वेदिका प्रभू आणि हर्षद पाटकर यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती मूर्तिकार हेमंत रामाडे यांनी दिली.