सिंधुदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यावर संविधानाचा जागर
सिंधुदुर्ग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या शौर्यगाथेचा साक्षीदार असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर गुरुवारी भारतीय संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संरक्षणाचा जागर घडला. संविधान दिनाचे औचित्य साधून आयोजित ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष उपक्रमांतर्गत किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम, संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक वारशाचे जतन, पर्यावरण संरक्षण आणि संविधानातील मूल्यांचे संवर्धन असा या उपक्रमाचा त्रिवेणी संगम अनुभवायला मिळाला.युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांच्या परिसरात एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि राज्यगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे आणि संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतींचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबवून ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत संविधानातील मूल्यांची मुळे असल्याचे प्रतिपादन केले. सर्वांना समान न्याय, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत शिवाजी महाराजांनी त्या काळातच दूरदृष्टीने विचार मांडला होता. आज आपण हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत चर्चा करतो; मात्र निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व शिवकालीन विचारांतही दिसून येते, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाची घोषणा करून संविधानाच्या सन्मानाची परंपरा अधिक व्यापक केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हा उपक्रम पुढे आला असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संविधानातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि प्रजासत्ताक मूल्यांमुळे विविध धर्म आणि जातींचे नागरिक एकत्रितपणे देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी देणारे संविधान हे देशाच्या एकात्मतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.आमदार निलेश राणे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करताना गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अधिवेशनानंतर पुरातत्त्व विभागासोबत बैठक घेऊन आवश्यक निधी आणि परवानग्यांबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाला मिळालेल्या संविधानामुळे प्रत्येक समाजघटकाला समानता, न्याय आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात संविधानाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे संविधानाचे महत्त्व केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता त्यातील मूल्ये वर्षभर आपल्या आचरणात आणली पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार गणेश लवे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य संतोष साटविलकर, दत्ता सामंत, संजू परब, बाबा परब, दीपक पाटकर, अशोक तोडणकर, समाजकल्याण अधिकारी तुषार गवळी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समता दूत संग्राम कासले, निलेश पवार यांनी केले. कार्यक्रमात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
konkansamwad 
