खर्डेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

खर्डेकर महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

 

वेंगुर्ला

 

    बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन ऑफ इंडिया’ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथालय विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. धनराज गोस्वामी तसेच संस्था प्रतिनिधी श्री. सुरेंद्र चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
       कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. संख्याशास्त्र विभाग प्रमुख प्रा. एस. बी. राठोड यांनी भेट दिलेल्या डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी सीनियर विभाग प्रमुख प्रा. डी. बी. राणे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विवेक चव्हाण, तसेच कनिष्ठ विभाग प्रमुख शितोळे सर उपस्थित होते.
       प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या ग्रंथपाल श्रीमती शुभदा माने-जाधव यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैज्ञानिक योगदानावर प्रकाश टाकत त्यांच्या प्रेरणादायी जीवनाची झलक उपस्थितांना दिली.
        वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद करताना प्रा. पी. जी. देसाई यांनी आपल्या मनोगतामध्ये वाचन संस्कृतीने डॉ. कलाम यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात बजावलेल्या भूमिकेचे वर्णन केले. "एक सामान्य माणूस ते भारताचा राष्ट्रपती" हा त्यांचा प्रवास वाचन आणि ज्ञानाच्या अखंड साधनेचे उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
       कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वाणिज्य विभागाचे डॉ. सचिन परुळकर यांनी आपल्या भाषणात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या पंचसूत्री सिद्धांताचा उल्लेख करत “पुस्तक – वाचक – ग्रंथालय” या तिन्ही घटकांच्या सुसंवादातून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन केले.
        या कार्यक्रमाला वरिष्ठ आणि कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विकास शिंगारे यांनी मानले, तर सूत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. शिवकन्या तोडकर यांनी केले.